डोळ्यांनी ओव्हर लोडची मापे काढणाऱ्या परिवहन विभागाला माहित नाही औरंगाबाद-मुंबईतील अंतर, खासगी ट्रॅव्हल्सला वाचवण्यासाठी गोलमोल कारवाई

Foto

औरंगाबाद - ट्रकमधील वजनाची डोळ्यांनी मापे काढणाऱ्या आणि जागेवर ओव्हर लोडची पावती देणाऱ्या परिवहन विभागाला औरंगाबाद-मुंबई आणि औरंगाबाद-पुणे अंतर मोजण्यासाठी अभ्यास करावा लागत आहे. एसटी, शिवशाही आणि खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर, यामध्ये किती तफावत आहे, याचीही आकडेवारी परिवहन विभागाकडे नसल्याची माहिती समोर आली आहे. औरंगाबाद प्रादेशिक परिवहन विभाग खासगी ट्रॅव्हल्सच्या मनमानी तिकीट आकारणीविरोधात गोलमोल  कारवाई करुन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. 


दिवाळीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा गैरफायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी दुपटीने तिकीट आकारुन प्रवाशांची लूट चालवली आहे. याच्या अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे आल्या आहेत. या संदर्भात
सांजवार्ता ऑनलाईनने ११ नोव्हेंबर रोजी ‘प्रवाशांची लूट: ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून औरंगाबाद-मुंबईसाठी अव्वाच्या सव्वा तिकीट दर’ हे वृत्त प्रसिद्ध केले होते. यानंतर परिवहन विभागाला जाग आली असून त्यांनी कारवाईच्या नावाखाली दोन शहरातील अंतर मोजणे आणि एसटी व खासगी ट्रॅव्हल्स यांच्या तिकीट दरातील तफावत यांचा अभ्यास करण्याचे काम सुरु केले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी सतीश सदामते सांजवार्ता ऑनलाईनशी बोलताना म्हणाले, की ट्रॅव्हल्स आणि एसटी बस यांचा मार्ग कोणता आहे, त्यांचे अंतर आणि थांबे किती आहे याचा अभ्यास सुरु आहे. त्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधित दोषी ट्रॅव्हल्स चालकांवर कारवाई करण्यात येईल.


आजच्या आधुनिक काळात गुगल मॅप आणि विविध अॅप द्वारे दोन शहरातील अंतर आणि विविध ट्रॅव्हल्स कंपन्यांच्या तिकीट दरांची माहिती काही क्षणात उपलब्ध होत आहे. अशा सर्व आधुनिक साधनांचा वापर सोडून परिवहन विभागाचे अधिकरी औरंगाबाद – मुंबई या शहरातील अंतर मोजण्यासाठी कोणते परिमाण वापरत आहेत, असा सवाल संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिवाळीआधीच ट्रॅव्हल्स चालकांनी निर्धारित दरापेक्षा जास्त तिकीट दर आकारणी केल्यास कारवाईचे आदेश दिले होते. मात्र परिवहन मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत खासगी ट्रॅव्हल्स चालकांनी दिवाळीच्या काळात  दुप्पट-तिप्पट तिकीट दर लागू करुन प्रवाशांची लूट चालवली होती. या संबंधीच्या तक्रारी परिवहन विभागाकडेही करण्यात आल्या, मात्र त्यांच्याकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवाशांची ही लूट आता कोण थांबवणार असा सवाल उपस्थित होत आहे.